मरिन ड्राइव्ह समुद्रात २३ वर्षांच्या तरुणीची आत्महत्या; वैयक्तिक कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय

सोमवारी सकाळी ती कामावर जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र कामावर न जाता ती चर्चगेट रेल्वे स्थानकात आली होती.
मरिन ड्राइव्ह समुद्रात २३ वर्षांच्या तरुणीची आत्महत्या; वैयक्तिक कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय
Published on

मुंबई : मरिन ड्राइव्हच्या समुद्रात एका २३ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र वैयक्तिक कारणावरून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ममता प्रवीण कदम असे या तरुणीचे नाव असून तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या पालकांना कळविण्यात आली आहे. लवकरच तिच्या पालकांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

अंधेरी येथे राहणारी ममता एका नामांकित आयटी कंपनीत कामाला होती. सोमवारी सकाळी ती कामावर जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र कामावर न जाता ती चर्चगेट रेल्वे स्थानकात आली होती. तेथून ती हॉटेल इंटरकॉन्टिनेटल हॉटेलसमोरील समुद्राजवळ आली. काही वेळ तिथे थांबल्यानंतर तिने तिची बॅग ठेवून समुद्रात उडी घेतली होती. ही माहिती एका नागरिकाकडून मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. त्यानंतर मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी ममताला पाण्यातून बाहेर काढून जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

तिच्या बॅगेतील कागदपत्रांवरून तिची ओळख पटली होती. त्यानंतर ही माहिती तिच्या पालकांना देण्यात आली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांना दिला जाणार आहे. लवकरच तिच्या पालकांची पोलिसांकडून जबानी नोंदविली जाणार आहे. या जबानीतून तिच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in