महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या! विधानसभेत ठराव मांडणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी वंचित व महिलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या! विधानसभेत ठराव मांडणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
Published on

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी वंचित व महिलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत संमत करून केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची घोषणा राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी विधान सभेत केली.

राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात अशासकीय ठराव मांडला होता. मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेल्या भावना हा या राज्य सरकारच्या भावना असल्याचे मंत्री जयकुमार रावल म्हणाले. फुले दाम्पत्य हे देशासाठी नव्हे तर जगासाठी एक मार्गदर्शक आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यासंदर्भात पुढील आठवड्यात विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला अशासकीय ठराव शासकीय ठराव म्हणून मांडण्यात येईल, असे आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिले.

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील १०० आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठवणार आहे. मुनगंटीवार यांनी विधानसभेत अशासकीय ठराव मांडला होता. क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी वंचित व महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न द्यावा, यासाठी विधानसभेने ठराव करावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

महात्मा फुले दाम्पत्याने केलेल्या कार्याचा गौरव केला. विधानसभेत २१ महिला आमदार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in