मुंबई : ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, डबेवाला न चुकता आपल्या ग्राहकांना डबा पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडत असतो. दिवाळीत मिळणारा बोनस प्रत्येक कामगारांचा अधिकार असून डबेवाल्याची सेवा लक्षात घेता, ग्राहकांनी एक महिन्याचा जादा पगार द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त डबेवाला कामगार चार दिवस सुट्टीवर जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
डबेवाला कामगार आपल्या ग्राहकांना न चुकता डबा पोहोचवण्याचे काम करत असतो. दिवाळी सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या गावी जातो. त्यामुळे दिवाळीनिमित्त डबेवाला कामगार दिवाळी सणानिमित्त १३ ते १६ नोव्हेंबर चार दिवस सुट्टीवर जाणार आहे. या चार दिवसामध्ये दोन शासकीय सुट्या आहेत. १७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी डबेवाला कामगार आपल्या नेहमीच्या वेळी कामावर रूजू होईल. परंतु चार दिवस घेतलेल्या सुट्टीचे वेतन कापू नये, अशी मागणी ग्राहकांकडे केल्याचे ते म्हणाले.
कोविड आला, लॅाकडाऊन झाले, वर्क फ्रॅाम होम याचा मोठा परिणाम डबेवाल्यांवर झाला. त्यामुळे व्यवसायाची घडी विस्कटली आणि व्यवसाय कमी झाला. तर अनेक डबेवाल्यांनी रोजगाराच्या दुसऱ्या संधी शोधल्या. पण काही डबेवाले अपुरा रोजगार, कमी उत्पन्न असतानादेखील डबे पोहोचवण्याचे काम चिकाटीने करत आहेत. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त ग्राहकांनी डबेवाला कामगाराला एका महिन्याचा जादा पगार दिवाळी बोनस म्हणुन खुशीने द्यावा, अशी मागणी केल्याचे तळेकर यांनी सांगितले.