
मुंबई : बीड, परभणीतील घटनेनंतर राज्यभरात पडसाद उमटत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असताना मराठा क्रांती मोर्चा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये आणि वाल्मिकी कराड यांना फाशीची शिक्षा द्या. धनंजय मुंडे यांसह पोलिसांना सह आरोपी करा, अशी मागणी केल्याचे मराठा क्रांती मोर्चा संघटनेचे समन्वयक अशोक कदम यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, बीड जिल्ह्यात २८ डिसेंबरला निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बीड आणि परभणी प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाही संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मराठा समाजाकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीडमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. वाल्मिक कराड यांच्या व्यवहाराची ईडीतर्फे चौकशी झाली पाहिजे, तसेच धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात मराठा कार्यकर्ते निदर्शने करतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी घ्यावे
बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी घ्यावे
बीड जिल्ह्यात समतोल बिघडला आहे. त्या ठिकाणी एकाच जातीचे ७० टक्के पेक्षा जास्त अधिकारी आहेत. त्या ठिकाणी सर्व समाजातील नागरिकांना न्याय दिला पाहिजे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवावे, अशी मागणी केल्याचे कदम यांनी सांगितले.