
मुंबई : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे, अशी मागणी म्युनिसीपल कामगार सेनेने पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. इतर महानगर पालिकेत कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान दिले जाते, त्यानुसार मुंबई महापालिकेतील कामगारांनाही देण्यात यावे, असे युनियनने म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिका अंतर्गत "मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत " ४५० अधिकारी, कर्मचारी कंत्राटी पध्दतीवर सन १९९८ पासून कार्यरत आहेत वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, वरिष्ठ डॉटस् प्लस टी.बी., एच. आय. व्ही., पर्यवेक्षक, आरोग्य प्रचारक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संगणकचालक, लेखापाल आदी विविध पदांवर काम करत आहेत. क्षयरोगाचे संशयीत रुग्ण शोधणे, त्यांची तपासणी करणे, क्षयरोग असलेल्यांना उपचार सुरू करणे, उपचार खंडीत रुग्णांचा पाठपुरावा करुन त्यांना पुन्हा औषधोपचार सुरू करणे आदी कामे या कर्मचारी, अधिकाऱ्यांना करावी लागते आहे; मात्र मागील अनेक वर्षापासून या कामगारांना सानुग्रह अनुदान दिले जात नाही.
प्रतिक्रिया
ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका, नाशिक महापालिका आदी महापालिकेतर्फे तेथील क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यानुसार मुंबई महापालिकेतील क्षयरोग विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
- बाबा कदम, अध्यक्ष, म्युनिसिपल कामगार सेना