सर्वसामान्यांना न्याय देणे, नागरिकांचे काम करुन आव्हानांना सामोरे जाणार - नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर

दहशतवाद्यांसोबत गुन्हेगारांवर वचक ठेवून मुंबई शहर सुरक्षित बनविण्याचा आपला प्रयत्न असेल.
सर्वसामान्यांना न्याय देणे, नागरिकांचे काम करुन आव्हानांना सामोरे जाणार - नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर

सर्वसामान्यांना न्याय देणे, नागरिकांचे काम करुन आव्हानांना सामोरे जाणार असल्याचे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून विवेक फणसळकर यांनी मावळते पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून गुरुवारी सायंकाळी आयुक्तपदाची सूत्रे घेतली.आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांसोबत गुन्हेगारांवर वचक ठेवून मुंबई शहर सुरक्षित बनविण्याचा आपला प्रयत्न असेल.

मुंबईची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासोबत गुन्हेगार आणि दहशतवाद्यांवर वचक ठेवण्याचे मुंबई पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहे. या आव्हानांना सामोरे जाताना सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळवून देणे, मुंबई सुरक्षित बनविण्याचा आपला प्रयत्न असेल, असे सांगितले.

कठीण परिस्थितीत आपल्यावर ही जबाबदारी आली असून त्यासाठी आपण तयार आहोत. पोलीस दलातील चांगले काम करण्याचा आपला मानस असून पोलिसांकडून बजाविण्यात येणाऱ्या दैनंदिन कर्तव्यासोबत शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांवर वचक ठेवणे, गुन्हेगारी रोखणे, गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास करण्यावर आपण भर देणार आहोत. तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली वागणूक मिळावी, त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी प्रयत्न करु. अल्पवयीन मुलांसह महिला, वृद्ध आणि अपंग व्यक्तींना सुरक्षित वाटण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहोत. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. जगात मुंबई पोलिसांचा नावलौकिक असून तीच पोलिसांची ताकद आणि खरी शान आहे. पोलिसांची प्रतिमा खराब होऊ नये, पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम तसेच त्यांच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलीस कायद्यानुसार काम करीत असल्याने पोलीस दलाला चांगले नेतृत्व देण्याचा आपला प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान मावळते पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मुंबई मुंबई पोलीस दलातर्फे निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in