

मुंबई : ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’चे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मुंबईत ८ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ या सातव्या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील. सायंकाळी ५:४५ वाजता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईच्या विविध भागातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.
वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पातळीवर वैचारीक नेतृत्वाचे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ची ओळख निर्माण झाली आहे. सन २०२० पासून वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी या क्षेत्रातील धोरणकर्ते, विविध नियामक संस्था, मध्यवर्ती बँकांचे प्रतिनिधी, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज, जागतिक गुंतवणूकदार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना या व्यासपीठावर एकत्र आणले जाते.
यंदाचे फेस्टीव्हल हे एजेंटिक एआय, टोकेनायझेशन, क्वांटम या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत असणार आहे. डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशनामध्ये भारताचे जागतिक नेतृत्व अधिक दृढ करणे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या परिषदेत धोरण, नियमन, तंत्रज्ञान, भांडवल आणि उद्योग या सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे.
पंतप्रधानांचा वडोदरा दौरा
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सप्टेंबर रोजी वडोदरा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते गुजरातसाठी ३५,२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. याशिवाय, ते शहरातील ‘नमो ४ विकसित भारत’ या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत. वडोदरा महानगरपालिकेने मोदी यांच्या वडोदरा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये हजारो नागरिक, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.