
जागतिक बाजारातील विक्रीचा मारा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात झालेली घसरण या कारणांनी भारतीय शेअर बाजारात सोमवारी दबाव दिसून आला. विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स ३६५ अंकांनी घसरला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून निधी काढून घेणे सुरुच असून रुपया सार्वकालिक नीचांकी पातळीवर गेल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसते.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३६४.९१ अंक किंवा ०.६७ टक्का घटून ५४,४७०.६७ वर बंद झाला. दिवसभरात तो ९१७.५६ अंक किंवा १.६७ टक्के कोसळून ५३,९१८.०२ वर गेला होता. त्यानंतर तो काही प्रमाणात सावरला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १०९.४० अंक किंवा ०.६७ टक्का घटून १६,३०१.८५ झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, इंडस्इंड बँक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांच्या समभागात घसरण झाली. तर पॉवरग्रीड, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, मारुती आणि बजाज फिनसर्व यांच्या समभागात वाढ झाली.
आशियाई बाजारात टोकियो आणि सेऊलमध्ये घसरण तर शांघायमध्ये वाढ झाली होती. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली होती तर अमेरिकन बाजारात शुक्रवारी मोठी घट झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.१७ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव १११ अमेरिकन डॉलर झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी ५,५१७.०८ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा
समभाग चार टक्के घसरला
रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सोमवारी चार टक्के घसरला. कंपनीने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीचा निकाल जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांना उत्साही करण्यात अपयश आले. दिवसअखेर बीएसईमध्ये कंपनीचा समभाग ३.९७ टक्के घसरुन २५१७.१५ रु. तर दिवसभरात तो ४.३५ टक्के घटून २,५०७.१९ रु. झाला होता. एनएसईमध्ये हा समभाग ४.२९ टक्के घसरुन २,५०८ रु. झाला.