

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पाच्या कामाचा फटका आता फिल्मसिटीतील चित्रीकरण मैदानाला बसला आहे. प्रकल्पासाठी मैदानांचा वापर होत असल्याने चित्रीकरण बंद राहून होणारे आर्थिक नुकसान आणि तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या भुईभाड्यापोटी १७४ कोटी १२ लाख रुपयांची मागणी चित्रनगरी महामंडळाने मुंबई महापालिकेकडे केली आहे. मात्र महापालिकेने प्रत्यक्ष ताब्यात आलेल्या जमिनीचा विचार करून २० कोटी ८ लाख ३० हजार ६७७ रुपये देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा जीएमएलआर हा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात गोरेगाव पूर्वेतील चित्रनगरी ते मुलुंड पश्चिमेतील अमरनगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी तीन मार्गिकांचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. ५.३० किलोमीटर लांबीच्या या हेरी बोगद्यांसाठी टीबीएमद्वारे खोदकाम सुरू आहे.
महसुली नुकसान
या कामासाठी फिल्मसिटीतील जोश मैदान, जोकर मैदान आदी जागांचा तात्पुरता वापर केला जात असून, टीबीएमचे सुटे भाग आणि खोदकामातून निघणारा गाळ येथे साठवला जात आहे तसेच ४५.७० मीटर रुंदीच्या रस्तारेषेला समांतर १,६०० मीटर लांब आणि १० मीटर रुंद जमिनीचा पट्टा प्रकल्पाच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चित्रीकरणासाठी मैदाने उपलब्ध नसल्याने महसुली नुकसान होत असल्याचा दावा चित्रनगरी महामंडळाने केला आहे. त्यापोटी नुकसानभरपाईसह भुईभाड्याची १७४.१२ कोटींची मागणी करण्यात आली. मात्र महापालिकेने सध्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या जमिनीपुरतीच रक्कम निश्चित केली आहे.
५१.३० लाख वार्षिक भुईभाडे
१,६०० मीटर लांब आणि १० मीटर रुंद जमिनीच्या पट्ट्यासाठी १४ मार्च २०२४ पासून जमीन परत मिळेपर्यंत दरवर्षी ५१ लाख ३० हजार २४० रुपये भुईभाडे देण्याचे प्रस्तावित आहे. जमीन किती काळ पालिकेच्या ताब्यात राहील हे निश्चित नसल्याने ३१ मार्च २०२९ पर्यंतचा कालावधी गृहीत धरून २०.०८ कोटींची तात्पुरती रक्कम निश्चित करण्यात आली. जीएमएलआरचे काम नोव्हेंबर २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.