Mumbai : रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; GMLR वरील १८० बांधकामे हटवली, खिंडीपाडा-सोनापूरमध्ये कारवाई

पश्चिम व पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामाला (जीएमएलआर) गती देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या एस विभागाने खिंडीपाडा-सोनापूर परिसरातील १८० बाधित बांधकामे शुक्रवारी हटवली.
Mumbai : रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; GMLR वरील १८० बांधकामे हटवली, खिंडीपाडा-सोनापूरमध्ये कारवाई
Published on: 

मुंबई : पश्चिम व पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामाला (जीएमएलआर) गती देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या एस विभागाने खिंडीपाडा-सोनापूर परिसरातील १८० बाधित बांधकामे शुक्रवारी हटवली. या कारवाईमुळे एस विभागाच्या हद्दीतील जोडरस्त्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला असून, रस्ता रुंदीकरणासह प्रकल्पाच्या पुढील कामांचा मार्ग सुकर होणार आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील वाहतूक अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. या जोडरस्त्याची एकूण लांबी १२.२० किलोमीटर असून, त्याचे काम चार टप्प्यांत करण्यात येणार आहे. यामध्ये रस्ता, भूमिगत बोगदा आणि उड्डाणपूल आदी कामांचा समावेश आहे. एस विभागाच्या हद्दीतील खिंडीपाडा-सोनापूर परिसरात या प्रकल्पाच्या उभारणीसाठी अडथळा ठरणारी सुमारे १८० बांधकामे होती. ती हटविण्याची मोहीम मुंबई महानगरमहापालिकेने शुक्रवारी राबवली आणि अनधिकृत बांधकामे तोडली.

जागा उपलब्ध होणार

मुंबई महापालिकेच्या एस विभागाच्या हद्दीतील जोडरस्त्याला अडथळा ठरणारी जवळपास सर्व बांधकामे हटविण्यात आल्याने प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. सध्या निष्कासित बांधकामांचा राडारोडा हटवण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर रस्ता रुंदीकरण आणि अन्य बांधकामांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

रहिवाशांचे पुनर्वसन

या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पात्र १०८ रहिवाशांचे महापालिकेच्या वतीने पुनर्वसन करण्यात आले आहे. अडथळे दूर झाल्याने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामाला पुढील टप्प्यात गती मिळण्याची अपेक्षा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त

उपायुक्तांच्या (परिमंडळ ६) मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोहिमेसाठी महापालिकेचे ३० हून अधिक अभियंते आणि १०० कर्मचारी तैनात होते. तसेच चार पोकलेन, चार जेसीबी आणि १० डंपर यांच्या मदतीने बाधित बांधकामे हटवण्यात आली. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ९० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in