देवीसाठी आकर्षक अलंकारांचा साज; पाच फूट मोत्यांच्या माळा, मुकूट, कर्णफुलांनी बाजार सजले

नवरात्रोत्सवात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि घरोघरी देवीच्या आकर्षक मूर्तींची स्थापना केली जाते. यंदा नवरात्रोत्सवात देवीला सजवण्यासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. देवीची शोभा वाढावी यासाठी मूर्तीला आकर्षक अलंकारांनी सजवले जाते. यंदाही देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण भुलेश्वर येथील बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी भक्तांची गर्दी उसळली आहे.
देवीसाठी आकर्षक अलंकारांचा साज; पाच फूट मोत्यांच्या माळा, मुकूट, कर्णफुलांनी बाजार सजले
Published on

मुंबई : नवरात्रोत्सवात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि घरोघरी देवीच्या आकर्षक मूर्तींची स्थापना केली जाते. यंदा नवरात्रोत्सवात देवीला सजवण्यासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. देवीची शोभा वाढावी यासाठी मूर्तीला आकर्षक अलंकारांनी सजवले जाते. यंदाही देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण भुलेश्वर येथील बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी भक्तांची गर्दी उसळली आहे.

नवरात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात नवरात्रोत्सव हा भक्तिभाव, उत्साह आणि परंपरेचा मिलाफ असतो. नऊ दिवसांत देवीची विविध स्वरूपात पूजाअर्चा केली जाते. विशेष म्हणजे देवीला दररोज अलंकारांनी सजवण्याची परंपरा आजही गावोगावी आणि घराघरांत जपली जाते. या अलंकारांमध्ये केवळ सौंदर्य नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही दडलेले आहे. देवीसाठी पाच फुटांपर्यंत मोतीच्या माळा, मुकूट, कंबरपट्टा खरेदीसाठी भुलेश्वर येथील बाजारात भक्तांची गर्दी उसळली आहे. ६ इंच ते पाच फुटांपर्यंतच्या माळा, बांगड्या, मुकूट, कर्णफुले खरेदीसाठी भक्त मुंबईतून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भुलेश्वर येथील बाजारात येत असतात, असे श्री सिद्धिविनायक ज्वेलर्सचे मालक महादेव खेडेकर यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना सांगितले.

सण कुठलाही असो, मुंबईत त्या सणाचा माहौल काही वेगळाच असतो. गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता २२ सप्टेंबर रोजी घरोघरी तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात देवीचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र देवीच्या स्वागताची लगबग सुरू असून सजावटीसाठी भक्तांची एकच धावपळ उडाली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात विविध आकर्षक देखावे साकारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून देवीचे अलंकार खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे.

देवीला परंपरेनुसार सोन्याचे दागिने, मोत्यांची माळ, पैंजण, कर्णफुले, नथ, वंकी, गजरा, कंबरेवर पट्टा असे विविध अलंकार परिधान केले जातात. काही ठिकाणी देवीला हिरा-माणिकजडित दागिन्यांनी सजवले जाते, तर ग्रामीण भागात चांदीचे व पारंपरिक सोन्याचे अलंकार वापरले जातात. तसेच गजरा, फुलांची वेणी देवीच्या रूपात भर टाकतात.

देवीच्या अलंकारांचे दर

  • गोल्ड प्लेटेड मुकूट

    २०० रुपये ते १०-१२ हजारांपर्यंत

  • पाच ते सहा फुटांचे हार

    ४,८०० रुपये

  • मोत्यांचा हार

    १२० रुपयांपासून सुरू

अलंकारांचे धार्मिक महत्त्व :

प्रत्येक अलंकाराचे वेगळे धार्मिक महत्त्व आहे. नथ ही मंगलतेचे प्रतीक मानली जाते, तर कर्णफुले शुद्धता आणि ज्ञानाचे द्योतक ठरतात. कंबरेवरील पट्टा म्हणजे शक्तीचे प्रतीक, तर गळ्यातील हार भक्तांचा अखंड स्नेह आणि भक्तीचे द्योतक समजला जातो. सोन्याचे अलंकार समृद्धीचे, तर चांदीचे अलंकार पवित्रतेचे प्रतीक मानले जातात. मात्र, सोने-चांदीचे आभूषण देवीच्या शृंगारात अपर्ण करणे शक्य नसल्याने अनेक भक्त तयार आभूषणे खरेदी करतात. मुंबईतील भुलेश्वर येथील दुकानात अलंकार खरेदीसाठी भक्तांची गर्दी होत असून मोत्यांच्या माळांना भक्त पसंती देत असल्याचे तेथील दुकानदारांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in