
मुंबई : देशातील मोठा उद्योग समूह गोदरेजची वाटणी होणार आहे. १२६ वर्षे जुना हा भारतीय उद्योग समूह सामोपचाराने विभक्त होणार आहे. वाटणीनंतर गोदरेज ब्रँडचे नाव कोणी वापरायचे यावर परिवारात चर्चा सुरू आहे.
गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत. एक गोदरेज इंडस्ट्रीज ॲॅण्ड असोसिएट्स आहे. त्याचे नेतृत्व अदि गोदरेज व त्यांचे भाऊ नादिर करतात. गोदरेज ॲॅण्ड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे नेतृत्व त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज व स्मिता गोदरेज कृष्णा करतात. गुंतवणूक बँकर निमेश कंपनी व कॉर्पोरेट वकील जिया मोदी हे कथितपणे जमशेद गोदरेज यांना सल्ला देत असल्याचे कळते, तर अदि गोदरेज यांना बँकर उदय कोटक व सीरिज श्रॉफ यांची कायदा फर्म अमरचंद मंगलदास ही सल्ला देत असल्याचे समजते. अदि गोदरेज यांचा मुलगा व गोदरेज प्रॉपर्टीजचे अध्यक्ष पिरोजशा गोदरेज हे चर्चेत सामील झाले आहेत.
१८९७ मध्ये अर्देशीर गोदरेज यांनी स्थापन केलेल्या या समूहाचे मूल्यांकन १.७६ लाख कोटी रुपये आहे. हा उद्योग समूह हार्डवेअर, होम अप्लायन्स, इलेक्ट्रॉनिक्स व अंतराळासाठी रॉकेट आदी बाबींचे उत्पादन करतो. कृषी उत्पादने, रिअल इस्टेट, वैयक्तिक निगेची उत्पादने क्षेत्रात कार्यरत आहे.
असे आहे गोदरेज कुटुंबीय
गोदरेज कुटुंबीयांत पाच जण आहेत. त्यात नादिर गोदरेज (अदि यांचे भाऊ), जमशेद गोदरेज, स्मिता कृष्णा (जमशेद यांची बहीण), रिशद गोदरेज (अदि, नादिर व जमशेद यांचे चुलत भाऊ) यांच्याकडे प्रत्येकी १५.३ टक्के हिस्सा आहे. जी ॲँड बी, पिरोजशा गोदरेज फाऊंडेशनकडे २३ टक्के हिस्सा आहे.