गोगावलेंचाच व्हिप चालणार; राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निकालाच्या प्रक्रियेबद्दल भाष्य केले आहे.
गोगावलेंचाच व्हिप चालणार; राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/मुंबई : विधानसभेत आता शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांचाच व्हिप म्हणजे पक्षादेश चालणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांनाच मान्यता दिली आहे. यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांची मोठी अडचण होणार आहे. कारण आमदारांना पक्षादेश मानणे बंधनकारक असते. पक्षादेश न मानल्यास व ते सिद्ध झाल्यास आमदारकी जाऊ शकते.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निकालाच्या प्रक्रियेबद्दल भाष्य केले आहे. ‘‘कमीत कमी वेळेत अत्यंत किचकट विषय सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सुप्रीम कोर्टाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आमदार अपात्रताप्रकरणी निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी दिवसाला १५ ते १६ तास काम केले. नागपूर अधिवेशना दरम्यान तर अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहून आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेतली. सुनावणी घेताना संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडत ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्यांचे पालन केले आहे,’’ असे राहुल नार्वेकर म्हणाले.

‘‘अध्यक्षांसमोर आता केवळ शिवसेना विधिमंडळ गट अस्तित्वात आहे. प्रत्येक आमदाराने आता त्याला जे योग्य वाटते व जे कायदेशीर चौकटीत बसते तो निर्णय घेऊन काम करावे,’’ असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. प्रतोद म्हणून आता भरत गोगावलेच असतील. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना देखील विधानसभेत भरत गोगावले यांनी बजावलेल्या व्हिपनुसारच काम करावे लागेल. आदित्य ठाकरे यांचाही यात समावेश होतो. त्यामुळे जर भरत गोगावले यांनी म्हणजेच शिवसेना विधिमंडळ पक्षाने बजावलेल्या व्हिपचे उल्लंघन झाल्यास पक्षादेश न मानल्याचे आणखीन एक प्रकरण खुले होईल. आमदाराने पक्षादेश न मानल्यास व ते सिद्ध झाल्यास त्याची आमदारकी जाऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in