मुंबई : गोखले पुलाच्या कामांत पुलाच्या उंचीत दोन मीटरने वाढ झाली आहे. व्हीजेटीआय याबाबत सर्वेक्षण करत अहवाल सादर करणार आहे. व्हीजेटीआयच्या अहवालानंतर गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये बर्फीवाला पुलाची जोडणी करण्याचा समावेश करून ती कामे हाती घेण्यात येतील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामांत ऐवढी मोठी चूक पालिकेवर टीकेची झोड उठली. त्यानंतर पालिका प्रशासनाने सारवासारव करत व्हीजेटीआयला साद घातली आहे. बर्फीवाला उड्डाणपूल हा गोपाळ कृष्ण गोखले पुलासोबत जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्ग येथे दुरुस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नियोजित केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. व्हीजेटीआय संस्थेच्या माध्यमातून सुचवण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार हे दोन्ही पूल जोडण्याचे काम लवकरच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
गोखले पुलाच्या महानगरपालिका क्षेत्रातील पुनर्बांधणीचे कार्यादेश हे २० एप्रिल २०२० रोजी देण्यात आले. तर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम १५ मार्च २०२१ रोजी सुरू झाले. जुन्या पुलाच्या निष्कासनाची कार्यवाही पूर्व दिशेला सुरू असताना रेल्वे प्रशासनाने २४ मार्च २०२१ आणि १६ एप्रिल २०२१ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार रेल्वे भागातील पुलाचे पुनर्बांधणीचे काम करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे काम करताना रेल्वे पुलाखाली किमान ६ मीटर इतकी ओव्हरहेड उंची ठेवून हे पुनर्बांधणीचे काम करावे. त्यानुसारच रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हर ब्रीज) ओपन वेब गर्डरच्या आराखड्याचे काम पूर्ण करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आले.
दोन्ही पुलांचे चढ-उतार हे एकमेकांच्या विरोधात!
गोखले पुलावर रेल्वे भागातील खांब क्रमांक ५ आणि बर्फीवाला जंक्शन हे जोडणीसाठी शक्य नसल्याचे सल्लागारांनी स्पष्ट केले होते. तसेच नव्याने बांधण्यात आलेला गोखले पुलाचा उतार हा स्वामी विवेकानंद मार्गाच्या दिशेने असून उत्तर दिशेचा बर्फीवाला पुलाचा उताराचा भाग गोखले पुलाच्या दिशेने आलेला आहे. दोन्ही पुलांचे चढ-उतार हे एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे दोन्ही पुलांचे उतार पाहता बर्फीवाला उड्डाणपूल हा गोखले पुलाला जोडणे शक्य नाही. अतिशय खोल उतार असल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दोन्ही पुलांच्या उंचीत २.८३ मीटरचा फरक
रेल्वे प्रशासनाने हा आराखडा ३० मे २०२२ रोजी मंजूर केला. आराखड्यात रेल्वे भागातील पुलाच्या ८.४५ मीटरच्या उंचीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. परिणामी रेल्वे हद्दीतील पुलाची उंची ही २.७३ मीटरने वाढली. सद्यस्थितील रेल्वे भागातील पुलाची पातळी व बर्फीवाला जंक्शन येथे पुलाची पातळी यामध्ये दोन्ही पुलाच्या उंचीतील फरक हा २.८३ मीटर इतका असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.