
मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेकडील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोखले पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र हरियाणाच्या अंबाला येथून गर्डरचे सुटे भाग आणत त्याची जोडणी करणे, पुलावर गर्डर लाँच करणे या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे पुलाची एक लेन सुरू करण्यासाठी दिवाळीनंतरचाच मुहूर्त लागणार असल्याचे समजते.
१९७५ मध्ये बांधण्यात आलेला गोखले पूल ३ जुलै २०१८ मध्ये कोसळला आणि दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने ७ नोव्हेंबर २०२२ मध्ये बंद करण्यात आला. गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेसह उपनगरातील वाहतूक कोंडीचा बोजवारा उडाला आहे. गोखले पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे. परंतु रेल्वे हद्दीतील पुलाचे पाडकाम कोण करणार, यावरून वाद निर्माण झाला आणि उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हस्तक्षेप करत रेल्वे हद्दीतील पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वेच करणार, हे स्पष्ट केले.
रेल्वे हद्दीतील पुलाचे पाडकाम पूर्ण झाले असून बांधकामासाठी मुंबई महापालिकेला ताबा देण्यात आला आहे. मात्र रेल्वे हद्दीतील खोदकाम, पुलावर टाकण्यात येणारे गर्डरचे सुटे भाग जोडणी याला वेळ लागत असल्याने पुढील दीड महिन्यात पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करणे शक्य नसल्याचे समजते. त्यामुळे गोखले पूल पुढील वर्षीच वाहन चालकांच्या सेवेत येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.