मुंबई : एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार, यावर आता पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल दीड वर्षानंतर अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची चार लेनची एक मार्गिका वाहतुकीसाठी सोमवारी संध्याकाळपासून खुली करण्यात आली. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याने पश्चिम उपनगरातील वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. गोखले पुलाच्या एका मार्गिकेवर हलक्या वाहनांना प्रवेश असून अवजड वाहनांना बंदी आहे.
दरम्यान, यावेळी स्थानिक आमदार अमित साटम, रुतुजा लटके, पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले या रेल्वे उड्डाणपूलावरील पादचारी पुलाचा काही भाग ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. त्या आधीच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले. पूल धोकादायक असल्याने ७ नोव्हेंबर २०२२ पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करून या उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने अंधेरी पूर्व व पश्चिमेसह वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती.
गोखले पुलाचे काम वेगाने करावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी लावून धरली. परंतु रेल्वे हद्दीतील पुलाचे काम कोण करणार, यावरून वाद निर्माण झाला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लक्ष घालत पश्चिम रेल्वे व मुंबई महापालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर पुलाचे काम पालिका करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर पालिकेने २ डिसेंबर २०२३ रोजी पहिला गर्डर लाँच केला. तसेच पुलाजवळील पोच रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पुलासाठी लागणारे गर्डर पंजाब येथील अंबाला कंपनीत तयार करण्यास उशीर झाल्याने पुढील कामे रखडली.
गोखले पूल चार लेनचा असून पश्चिम द्रुतगती महामार्ग अंधेरी पूर्व ते एस. व्ही. रोड अंधेरी पश्चिमेला जोडतो. सोमवारी अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी एक मार्गिका अखेर खुली करण्यात आली. तसेच येथील पोहोच रस्त्यांचे काम, ना. सी. फडके मार्ग आणि तेलीगल्ली जंक्शन येथे ग्रेड सेपरेटर या कामांचे लोकार्पणही करण्यात आल्याने येथील वाहतूककोंडी सुटण्यास आता मदत होणार आहे. दरम्यान, संपूर्ण पूल डिसेंबर २०२४ नंतर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे.
पुलाची लांबी– रेल्वे भूभागात– ९० मीटर
रेल्वेबाहेर – पूर्वेस २१० मीटर, पश्चिमेस – १८५ मीटर
पुलाची रुंदी – (रेल्वे भूभागात) – १३.५ मीटर
रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह- १२ मीटर (दोन्ही बाजूस)
एकूण रुंदी - २४ मीटर