जुहू ते अंधेरी थेट प्रवास! गोखले, सी. डी. बर्फीवाला पुलाची एक मार्गिका खुली; अवजड वाहनांना बंदी

गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला या दोन्ही पुलातील उंची समसमान केल्याने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जुहू दिशेने अंधेरीपर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
जुहू ते अंधेरी थेट प्रवास! गोखले, सी. डी. बर्फीवाला पुलाची एक मार्गिका खुली; अवजड वाहनांना बंदी
@mybmc/ X
Published on

मुंबई : गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला या दोन्ही पुलातील उंची समसमान केल्याने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जुहू दिशेने अंधेरीपर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र सध्या या मार्गिकेवरून हलक्या वाहनांना परवानगी असून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असणार आहे.

अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा, वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली आहेत. पुलावर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती संरचनात्मक कामे, वाहतूक व्यवस्थापनाची कामे, इतर चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मार्गिका खुली केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी सायंकाळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांच्‍याद्वारे आरेखित करण्‍यात आला होता. तर, पूल जोडणी कार्यपद्धती वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांचेद्वारे निश्चित करण्‍यात आली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) यांनी या कार्यपद्धतीची पडताळणी करून त्यात काही सुधारणा सुचवल्या. सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली.

या पुलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्‍ट्रक्‍चरली सेफ) असल्‍याचे व्हीजेटीआयमार्फत घोषित करण्‍यात आले आहे. पुलाच्‍या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्‍याच्‍या दृष्‍टीने वाहतूक व्‍यवस्थापनासंबंधित अनुषांगिक कामे व चाचण्‍या वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार पूर्ण करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यानुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपासून पश्चिम-पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे.

गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंचीरोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. जुहू ते अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन हे मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होतानाच इंधन व वेळेच्‍या बचतीसह वायूप्रदूषण कमी होण्‍यास मदत होणार आहे.

वाहतुकीसाठी हलक्या वाहनांना परवानगी

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिलीमीटरवर उचलण्यात आला आहे. या जोडणीसाठी गेल्या दोन महिन्‍यांपासून अथक कामे सुरू होती. हे आव्हानात्मक काम दिवस-रात्र सुरू ठेवून ७८ दिवसांत पूर्ण झाले आहे. जुहूच्या दिशेने अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे. सध्‍या हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश दिला जाणार असून अवजड वाहनांना मात्र वाहतुकीस मनाई करण्‍यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in