मुंबई : सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून साडेआठ कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई डीआरआयच्या मुंबई, गोवा आणि वाराणसी युनिटच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केल्याचे सांगण्यात आले.
सोन्याची तस्करी करणारी एक आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी अशा प्रकारे तस्करी करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असतानाच या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात तस्करीमार्गे आणलेले काही सोने जप्त केले होते. ही तस्करी खासगी वाहनासह रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई युनिटच्या अधिकाऱ्यांनी पुण्याजवळ एका खासगी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे या अधिकाऱ्यांना पाच किलो सोने सापडले होते. त्यांच्या अटकेनंतर सांगलीतील एका गावातून अन्य एका हॅडलरला या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या राहत्या घरी झडती घेतल्यानंतर तिथे आणखीन काही सोने या युनिटने जप्त केले होते. त्यानंतर वाराणसी युनिटच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८ किलो ७०० ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. या संपूर्ण कारवाईत या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेआठ कोटीचे सोने जप्त केले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून, त्यांच्या अटकेसाठी आता याा अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.