बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; खात्यात आज जमा होणार बोनस

बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) न मिळाल्याने अंधारात गेली. मात्र आता विधानसभेत आचारसंहिता संपल्यामुळे सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या बँकेत थेट सानुग्रह अनुदानाची २९ हजारांची रक्कम जमा होणार आहे, असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; खात्यात आज जमा होणार बोनस
Published on

मुंबई/प्रतिनिधी : बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) न मिळाल्याने अंधारात गेली. मात्र आता विधानसभेत आचारसंहिता संपल्यामुळे सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या बँकेत थेट सानुग्रह अनुदानाची २९ हजारांची रक्कम जमा होणार आहे, असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई मनपाच्या कामगार कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २ तास आधी प्रशासनाने पालिकेतील विविध कामगार संघटनांच्या कामगार नेत्यांना बोलावून सानुग्रह अनुदानाची रक्कम जाहीर केली होती. मात्र त्यावेळी बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. मात्र पालिका प्रशासनाने ८० कोटी रुपयांची रक्कम बेस्टच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केली, पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करता आले नव्हते. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. पण आयोगाने आचारसंहिता लागू असल्याने अशी परवानगी दिली नाही. अखेर आदर्श आचारसंहिता संपल्याने बेस्टच्या २६ हजार कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी बेस्ट कामगारांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदानाची २९ हजारांची रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांना उशिरा का होईना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळत आहे, याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया सुहास सामंत यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in