देशात चांगलंही घडतंय !

भारताचा उत्कर्ष सहन होत नाही, अशी खंतही भागवत यांनी व्यक्त केली
देशात चांगलंही घडतंय !

मुंबई : देशात घडणाऱ्या वाईट गोष्टींची जितकी चर्चा होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक चांगल्या गोष्टींची चर्चा होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

कांदिवली येथील श्रीमती धनकुवरबेन बाबूभाई ढाकण रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. ते म्हणाले की, अनेकदा नकारात्मक बाबींवरील चर्चा ऐकायला येते. पण, देशात अनेक ठिकाणी फिरल्यास वाईट गोष्टींपेक्षा ४० पट अधिक चांगल्या गोष्टी झालेल्या तुम्हाला आढळतील. तरीही भारतात वाईट गोष्टींचीच चर्चा जास्त होते, असे त्यांनी सांगितले.

भागवत म्हणाले, ‘‘सरकारच्या धोरणांमुळे देशाचा विकास झाला आहे. तसेच सरकारमधील जबाबदार लोकांमुळे हे घडले आहे. काही जण काहीच करत नसल्यानेदेखील अनेक बाबी सुरळीत सुरू आहेत. उलट त्यांनी काम करायला सुरुवात केली, तर समस्या निर्माण होतील, असा टोलाही त्यांनी हाणला.

‘‘४० वर्षांपूर्वी भारताला वैभव प्राप्त करून देण्याची लोकांची इच्छा आज अधिक प्रबळ आहे. ही इच्छा वाढली पाहिजे. भारत विकास करत आहे, मात्र आम्ही अजून इतके सामर्थ्यवान नाही. काहींना भारताचा उत्कर्ष सहन होत नाही, अशी खंतही भागवत यांनी व्यक्त केली.

‘केवळ अन्न, वस्त्र, निवारा गरजेचा नाही, तर त्या जोडीला शिक्षण व आरोग्य हेही घटक समाजासाठी अत्यावश्यक बनले आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

‘‘आम्ही महाविद्यालयात असताना भाक्रा नांगल धरणे म्हणजे आधुनिक तीर्थक्षेत्रे समजली जात होती. आता रुग्णालये ही आधुनिक तीर्थक्षेत्रे बनली आहेत.’’ भागवत यांनी हिटलरचे परराष्ट्र मंत्री वॉन रिबेनट्रॉप यांचा किस्सा सांगितला. ‘‘रिबेनट्रॉप हे दुसऱ्या महायुद्धापूर्वी इंग्लंडला गेले होते. ते का आले आहेत, याची ब्रिटिशांना जाणीव होती. त्यांना इंग्लंड युद्धासाठी किती सज्ज आहेत, हे पाहायचे होते. इंग्लंडने कार्डबोर्डची विमाने तयार केली, नागरिकांना लष्करी गणवेश घालायला लावला. त्यातून इंग्लिश जनता ही मजबूत असल्याचा समज जर्मनीने करून घेतला,’’ असे भागवत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in