मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीला अपघात झाला आहे. रुळांवरुन पाच डबे खाली घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघाता कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या अपघाताचा परिणाम इतर गाड्यांच्या वेळापत्रकारवर झाला आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या पाच एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. रेल्वे विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
मध्ये रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी रुळावरुन घसरली. यात चार वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे पाच डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यान पनवेल ते कळंबोली विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मध्ये रेल्वेचं अभियांत्रिकी पथकासह कल्याण आणि कुर्ला या ठिकाणांहून अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
या अपघाताचं अद्याप कारण समोर आलं नाही. डब्बे घसरण्याचं कारण काय? याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच घसरलेले डब्बे रेल्वे रुळांवरुन बाजूला काढण्याचं आणि रुळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडून पडल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागलं आहे.