
मुंबई : गोरेगाव येथे सकाळी बेस्ट बसने ट्रकला दिलेल्या धडकेत सहा प्रवाशांसह आठ जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बेस्ट बस दिंडोशीहून शिवडीला निघाली होती. त्यावेळी सर्व्हिस रस्त्यावरून एक कार बसच्या समोर आली. ज्यामुळे बसचालकाला डावीकडे वळावे लागले. तथापि, त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातात बसचालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले. अश्रफ हुसेन, सीताराम गायकवाड, भारती मांडवकर, सुधाकर रेवाळे, पोचिया कानपोची व अमित यादव अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.
बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, घटनांचा क्रम निश्चित करण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ‘प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत,’ असे प्रवक्त्याने सांगितले.