

मुंबई : गोरेगाव (प.) भगतसिंग नगर येथील एका घरात शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास फ्रीजचा स्फोट झाल्यानंतर आग लागली. यावेळी गाढ झोपेत असलेल्या पावसकर कुटुंबातील संजोग पावसकर यांच्यासह हर्षदा पावसकर आणि कुशल पावसकर या दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला. रात्रीच्या वेळी आई कामावर गेल्यामुळे बचावली, मात्र सकाळी घरी परतल्यावर उरला होता तो फक्त राख झालेला संसार आणि आपल्या माणसांचे मृतदेह.
गोरेगाव (प.) येथील भगतसिंग नगर परिसरात राहणारे पावसकर कुटुंब झोपले होते. पहाटे ३ च्या सुमारास अचानक घरातील फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिक जागे झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पावसकर यांच्या कुटुंबाच्या घराला बाहेरून प्लास्टिक शीट लावली असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही मिनिटांत आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढा घातला. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी मुलांनी आटोकाट प्रयत्न केले. अवघ्या १२ वर्षांचा कुशल स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन लपला होता. मात्र, प्लास्टिक जळाल्यामुळे निर्माण झालेला विषारी धूर आणि वाढलेली उष्णतेमुळे कुशलसह त्याचे वडील आणि बहिणीचा गुदमरून व होरपळून जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. फ्रीजचा स्फोट शॉर्टसर्किटमुळे झाला की अन्य काही तांत्रिक कारणाने, याचा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत.
आईच्या जगण्याची उमेद हरपली !
पावसकर यांची पत्नी रात्रपाळी असल्यामुळे कामावर गेल्याने या दुर्घटनेतून बचावली. सकाळी घरी परतल्यानंतर तिला हे भीषण वास्तव समोर दिसले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. पती आणि दोन्ही मुलांचा आधार हरपल्याने तिच्या जगण्याची उमेद हरपली.