गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाचे काम वेगात; १० मार्चपर्यंत टीबीएम शाफ्टमध्ये उतरवण्याची तयारी; जूनपासून प्रत्यक्ष बोगदा खोदकाम

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्यांसाठी आवश्यक असलेल्या ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाचे काम वेगात
गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाचे काम वेगातPhoto : X (@mybmc)
Published on

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्यांसाठी आवश्यक असलेल्या ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू आहे.

१० मार्च २०२६ पर्यंत बोगदा खनन संयंत्रे (टीबीएम) शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू होणार असून जून २०२६ पासून प्रत्यक्ष बोगदा खोदकामास प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी केली.

यावेळी त्यांनी कामाचा वेग आणि गुणवत्ता कायम राखण्याचे स्पष्ट निर्देश दिले. निर्धारित कालमर्यादेतच प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

गोरेगाव येथील चित्रनगरी परिसरात सुरू असलेल्या लॉन्चिंग शाफ्टचे अंदाजे आकारमान २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे.

आतापर्यंत २३ मीटर खोलीपर्यंत खोदकाम पूर्ण झाले असून बाजूच्या भिंती सुरक्षित राहाव्यात यासाठी ‘रॉक अँकरिंग’ करण्यात आले आहे. उर्वरित ७ मीटर खोदकाम पूर्ण करून टीबीएम कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या ‘क्रेडल’ची निर्मिती तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहतुकीवरील ताण कमी होणार

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना थेट जोड मिळणार असून उत्तर मुंबईतील वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. जोगेश्वरी–विक्रोळी जोड रस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८ किलोमीटरने कमी होणार असून प्रवास वेळ, इंधन बचत आणि कार्बन उत्सर्जनात घट होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तीन महिन्यांत टीबीएम आणि गॅन्ट्री जोडणार

सध्या दररोज सुमारे १,४०० ते १,५०० घनमीटर दगड-माती उत्खननातून बाहेर पडत असून, १२० वाहनांद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे. एका टीबीएमचे सर्व घटक कार्यस्थळी उपलब्ध झाले असून, दुसऱ्या टीबीएमचे उर्वरित घटक गुरुवारी रात्री दाखल होणार आहेत. १० मार्चपर्यंत टीबीएम शाफ्टमध्ये उतरवण्यात येतील. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांत टीबीएम आणि त्यामागील तीन गॅन्ट्री जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हा तिहेरी मार्गिकेचा पेटी बोगदा अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक असून टीबीएमच्या साहाय्याने सुमारे ५.३ किलोमीटर लांबीचे दुहेरी बोगदे खोदले जाणार आहेत. पेटी बोगद्यासह एकूण अंतर ६.६२ किलोमीटरचे असेल. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास सुमारे १४.४२ मीटर असेल, असे बांगर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in