Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड; BMCची कारवाई सुरूच

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड; BMCची कारवाई सुरूच
Published on

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम अपेक्षित गतीने सुरू न ठेवल्‍याप्रकरणी कंत्राटदारास ५० लाख रूपयांच्या दंडाची आकारणी करावी, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. उड्डाणपुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची कुमक वाढवावी. ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी - गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान १.२६ किलोमीटर लांबीच्‍या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या उड्डाणपुलाच्‍या कामाची अभिजीत बांगर यांनी बुधवारी पाहणी केली. तसेच, विविध निर्देश दिले. उप आयुक्‍त गिरीश निकम, कार्यकारी अभियंता नरेश मेघराजानी यांच्‍यासह पालिका अभियंते, सल्‍लागार उपस्थित होते.

दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. दिंडोशी न्‍यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, ३१ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तसेच, एकूण ३० पैकी २० स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १० स्पॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे. एकूण ७५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. खांबांवर तुळई स्‍थापित करणे, डेक स्‍लॅब ओतकाम, पोहोच मार्ग आदी कामांसाठी वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे.

अडथळा ठरणारे ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करा!

दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उड्डाणपूल उतरतो, त्‍या ठिकाणी पोहोच रस्‍ता केला जाणार आहे. मात्र, या मार्गात जलवाहिन्‍या, सांडपाणी नाला आणि अदाणी पॉवर यांचे विद्युत परिवर्तक (Transformer) अडथळा ठरत आहे. त्‍यांचे तातडीने स्‍थलांतरण / नव्‍याने बांधणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in