
मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला गती मिळणार आहे. जुळ्या बोगद्यासाठी आवश्यक असलेली १९.४३ हेक्टर वनजमीन पालिकेकडे वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे. इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.
तसेच, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे.
जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर आहे. हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात आहे. प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत.
बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुवीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश आहे. पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची तजवीज देखील बोगद्याखाली करण्यात आली असल्याची माहिती बांगर यांनी दिली.
पूर्व ते पश्चिम उपनगर २५ मिनिटांत
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प पालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान २५ मिनिटांत प्रवास करता येणार आहे.