Mumbai : जुळ्या बोगद्यांमुळे प्रवास होणार सुसाट; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या टप्प्याला सुरुवात, टीबीएम मशीनद्वारे ४.७० किमी बोगदा खणणार

वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आता सुरू होणार आहे.
Mumbai : जुळ्या बोगद्यांमुळे प्रवास होणार सुसाट; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या टप्प्याला सुरुवात, टीबीएम मशीनद्वारे ४.७० किमी बोगदा खणणार
Published on

मुंबई : वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आता सुरू होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडमधील खिंडीपाडा या मार्गावर तब्बल ४.७० किलोमीटर लांबीचे दोन जुळे भूमिगत बोगदे उभारण्यात येणार असून त्यांच्या खनन कामाला आठवड्यापासून सुरुवात होणार आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प चार टप्प्यांत राबवण्यात येत आहे. गोरेगाव पूर्वेकडील रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथे १.२६ किमी लांबीचा उड्डाणपूल, खिंडीपाडा ते तानसा जलवाहिनीमार्गे नाहूर रेल्वे मार्गापर्यंत १.८९ किमीचा उड्डाणपूल असा मार्ग आहे.

असे असतील बोगदे

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील जुळे बोगदे प्रत्येकी तीन मार्गिकांचे असतील. एकमेकांना समांतर असलेल्या या बोगद्यांचा व्यास साधारण १४.२० मीटर तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात तो १३ मीटर असेल. या बोगद्यांच्या खननासाठी परदेशातून टीबीएम मशीनचे सुटे भाग मुंबईत दाखल झाले असून त्यांची जोडणी ३० जुलै २०२६ रोजी पूर्ण झाली आहे. सुमारे चार मजली उंचीच्या या महाकाय यंत्राद्वारे आता प्रत्यक्ष बोगदा खननाला सुरुवात होणार आहे. या टीबीएममध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीतही मलब्याची जलद वाहतूक, अधिक उत्पादनक्षमता शक्य होणार आहे.

दीड तासांचा प्रवास २० मिनिटांवर

सध्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडमार्गे गोरेगावकडून मुलुंड, ठाण्याकडे जाण्यासाठी वाहतूककोंडीमुळे साधारण एक ते दीड तास लागतो. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यातील जुळ्या बोगद्यांमधून केवळ पाच ते दहा मिनिटांत प्रवास करता येणार असल्याने मुंबईच्या पूर्व-पश्चिम जोडणीला मोठी चालना मिळणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in