गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप

गोवंडी येथील रोड क्रमांक ८ वरील संजयनगर मुंबई महापालिकेच्या शाळा परिसरात शाळेच्या व्यवस्थापनाला धमकावून बकरे बांधण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत गुरुवारी उपस्थित करण्यात आला.
गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप
गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप
Published on

मुंबई : गोवंडी येथील रोड क्रमांक ८ वरील संजयनगर मुंबई महापालिकेच्या शाळा परिसरात शाळेच्या व्यवस्थापनाला धमकावून बकरे बांधण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत गुरुवारी उपस्थित करण्यात आला. शिक्षण समितीचे सदस्य निखिल व्यास यांनी हा मुद्दा हरकतीच्या मुद्द्याद्वारे मांडला आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

शिक्षण समितीच्या बैठकीत निखिल व्यास यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असून तिचा वापर पशुपालनासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ही शाळा शिक्षणासाठी आहे की पशुपालनासाठी?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिक्षण समितीचे सदस्य व्यास यांनी मुंबईच्या लोकसंख्यात्मक रचनेत आणि शहराच्या चेहरामोहर्‍यात बदल घडवून आणण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची शंका यावेळी व्यक्त केली.

या प्रकारामागे नेमके कोण आहेत? शाळेचा वॉचमन स्थानिक दबावगटांशी संगनमत करून काम करत आहे का आणि यामागे कोणाचा प्रभाव आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

निखिल व्यास यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याला सभागृहातील अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला. नगरसेविका स्वप्ना महात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला.

पुढील बैठकीत अहवाल सादर करा - शिरवडकर

शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, तोपर्यंत हा हरकतीचा मुद्दा प्रलंबित ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in