गोवंडीत डम्परच्या धडकेत चौघांचा मृत्यू; डम्परचालक पोलिसांच्या ताब्यात

गोवंडी शिवाजीनगर भागात एका डम्परने चार जणांना चिरडल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ही दुर्घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
गोवंडीत डम्परच्या धडकेत चौघांचा मृत्यू; डम्परचालक पोलिसांच्या ताब्यात
Published on

मुंबई : गोवंडी शिवाजीनगर भागात एका डम्परने चार जणांना चिरडल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ही दुर्घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी डम्परचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मात्र जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीतील शिवाजीनगर सिग्नल परिसरात मोठी वर्दळ असते. दरम्यान शनिवारी याच शिवाजीनगर भागात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर डम्परने चौघांना धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी चालकाला ताब्यात घेतले. चौथ्या व्यक्तीचा रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. नूर मोहम्मद गलेन (४२), आर्यन मोहम्मद गलेन (११), मोहम्मद हुसेन खान (११), आणि अब्दुल गनी खान (९) अशी मृतांची नावे आहेत. हे चौघे एकाच दुचाकीवरून साकीनाक्याच्या दिशेने निघाले होते.

अपघातानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर जवळपास सव्वा दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूककोंडी झाली होती. विक्रोळी व घाटकोपरकडून येणारी वाहने तसेच नवी मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघाताच्या वेळी डम्परचालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. चालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in