Mumbai BMC : गोवंडी, मानखुर्दकरांचा पाणीप्रश्न सुटणार; पाणीपुरवठा विभागाने घेतला 'हा' निर्णय

मुंबई पालिकेच्या एम पूर्व विभागातील गोवंडी व मानखुर्द विभागात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे नवीन जलवाहिन्या टाकणे आणि जुन्या जलवाहिन्यांचा आकार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून कामाची सुरुवात होणार आहे.
गोवंडी , मानखुर्दकरांचा पाणीप्रश्न सुटणार; नव्या जलवाहिन्या टाकणार, जुन्यांचा आकार वाढवणार
गोवंडी , मानखुर्दकरांचा पाणीप्रश्न सुटणार; नव्या जलवाहिन्या टाकणार, जुन्यांचा आकार वाढवणार(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबई पालिकेच्या एम पूर्व विभागातील गोवंडी व मानखुर्द विभागात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे नवीन जलवाहिन्या टाकणे आणि जुन्या जलवाहिन्यांचा आकार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून कामाची सुरुवात होणार आहे. यासाठी पालिका अंदाजे १५ कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे गोवंडी मानखुर्दकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, देवनार, बैंगनवाडी परिसरातील अनेक भागात रहिवाशांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेकांच्या घरी पाणी पोहोचत नाही. त्यामुळे रहिवाशांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या भागात बहुतांश झोपडपट्टी असून येथे सर्वसामान्य व गरीब कुटुंबांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दररोज टँकरचे पाणी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. यामुळे अनेक वेळा स्थानिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारला होता.

स्थानिकांच्या रोषानंतर पालिकेला जाग

स्थानिकांच्या रोषानंतर मुंबई महानगरपालिकेने या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह नवीन जलवाहिन्या टाकणे, जलवाहिन्यांचे आकारमान वाढवणे ही कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही कामे करण्यासाठी १४ कोटी ८० लाख ६४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या भागांतील पाणीप्रश्न मिटणार

एम-पूर्व विभागातील दत्तनगर, मिर्झा गालिब मार्ग, शाहूल हमीद मार्ग, नटवर पारिख कम्पाऊंड, संजयनगर भाग १, लुंबिनी बाग, रफीनगर, झाकीर हुसैननगर, आदर्शनगर, गायकवाडनगर, देवनार गाव इत्यादी भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार असून या ठिकाणांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in