सरकारची धावाधाव! मराठा आरक्षणासाठी उपसमितीची बैठक : जरांगे-पाटलांच्या उपोषणाची व्याप्ती राज्यभर
Hp

सरकारची धावाधाव! मराठा आरक्षणासाठी उपसमितीची बैठक : जरांगे-पाटलांच्या उपोषणाची व्याप्ती राज्यभर

मराठा आरक्षण आंदोलनाचा पुढील टप्पा आणि जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
Published on

मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा सुरू केलेले आमरण उपोषण व त्यांची खालावत चाललेली प्रकृती तसेच दुसऱ्या टप्प्यातील राज्यभरात सुरू झालेले आंदोलन या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरक्षणासाठी धावाधाव सुरू केली आहे. जरांगे-पाटील यांचे उपोषण थांबावे, यासाठी मार्ग काढणे आणि जरांगे-पाटील यांचे उपोषण थांबविण्यासाठी राज्य शासनाच्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी बोलावली आहे.

महाराष्ट्र सरकारला मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे राहून मराठा समाजाला आरक्षण देण्याची जाहीर शपथ घेतली. शासनाने कुठलीही कृती न केल्याने मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाने राज्यात सर्वपक्षीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी आंदोलन हाती घेतले. चार तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्याला जोडूनच राज्यभरात साखळी उपोषण सुरू केले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारपासून राज्यात गावोगावी आमरण उपोषण करण्याच्या सूचना राज्यातील मराठा संघटनांना दिली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचा पुढील टप्पा आणि जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील अमित शहांसोबतच्या बैठकीनंतरही मराठा आरक्षणाची कोंडी फुटली नाही. शिर्डी दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठा आरक्षणावर मौन बाळगल्याने मराठा समाजात तीव्र पडसाद उमटले. आता आजपासून सुरू होत असलेल्या राज्यभरातील आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.

जरांगे-पाटील यांनी सरकारच्या साथीने प्रयत्न करावेत -देवेंद्र फडणवीस

राज्यातील तापत चाललेले मराठा आरक्षण आंदोलन आणि जरागे-पाटील यांच्या आमरण उपोषणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट केली, ‘‘कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणे, हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सर्व प्रयत्न करीत आहेत. आम्ही आरक्षण देणारच, पण त्यासाठी जी प्रक्रिया असते त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या प्रयत्नात जरांगे-पाटील यांनी सरकारसोबत येऊन त्या प्रयत्नात सहभागी व्हावे,’’ असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपसमितीची सोमवारी बैठक -चंद्रकांतदादा पाटील

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार, ३० रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी माहिती दिली. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेली समिती आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in