ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचे सरकारचेच षड‌्यंत्र -नाना पटोले

सरकारमधील मंत्रीच सामाजिक शांतता भंग होईल अशी चितावणीखोर विधाने करत आहेत.
ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचे सरकारचेच षड‌्यंत्र -नाना पटोले
Published on

मुंबई : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. महागाईत जनता होरपळून निघत आहे. बेरोजगारांच्या वाढत असलेल्या आत्महत्या या गोष्टींपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद सरकार निर्माण करण्याचे षड‌्यंत्र रचत आहे. राज्यातील या अशांततेला सर्व सरकारच जबाबदार असून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आग लावून सरकार मजा पहात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. सरकारमधील मंत्रीच सामाजिक शांतता भंग होईल अशी चिथवणीखोर विधाने करत असून याप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.

आरक्षणाच्या मुद्यांवरून राज्यात चिघळलेली परिस्थिती, मंत्र्यांकडून होत असलेली वादग्रस्ते वक्तव्ये या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी सोमवारी टिळक भवन येथे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अशांतता निर्माण करून ‘जळता महाराष्ट्र’ करून ठेवला आहे. सरकारमधील मंत्रीच सामाजिक शांतता भंग होईल अशी चितावणीखोर विधाने करत आहेत. आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप हे भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१४ साली भाजप व फडणवीस यांनीच आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली, पण गेल्या ९ वर्षांत भाजपने कोणत्याच समाजाला आरक्षण दिले नाही, याकडे लक्ष वेधत आरक्षणाच्या नावाखाली समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in