विकासक मित्राला जमीन देण्याचा सरकारचा डाव; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १,५०० एकर मिठागरांची जमीन खास बिल्डरला देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी केवळ अदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नव्हे तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १,५०० एकर मिठागरांची जमीन खास बिल्डरला देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेड जवळच्या मिठागरांच्या जागेची पाहणी केली. गायकवाड म्हणाल्या की, मुंबईकरांचे हक्क मारायचे, मुंबईचे महत्त्व कमी करायचे आणि मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायच्या हा अदानी कंपनीचा एकमेव अजेंडा आहे. अदानी कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी हे सरकार वाट्टेल त्या थराला जात आहे. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असून पर्यावरणदृष्ट्या मुंबईला याचे भयंकर परिणाम सोसावे लागणार आहेत. मुंबईकरांचा विरोध असताना टेंडरमध्ये सोयीस्करपणे बदल करून अदानीला धारावीची जागा दिली आणि नंतर धारावी पुनर्विकासाच्या आडून मुंबईतील जवळपास १,५०० एकर जागा आपल्या विकासक मित्रांच्या घशात घातली. हे होत असताना आता अजून १ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा कंपनीने केला आहे, असेही त्या म्हणाल्या. खारफुटी जमिनींवर सरसकट बांधकाम परवानगी देण्याचे परिणाम होणार असून ते संरक्षण कायद्याच्याही विरोधात आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in