
भाजप नेत्यांच्या भेटीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे पत्र पाठण्यात आले. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी गुरुवारी विशेष अधिवेशन बोलावून बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारचा फैसला लवकरच होणार आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांचा आदेश बेकायदेशीर असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. तसेच आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्राद्वारे माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे कारस्थान आता उघड झाले आहे. त्यामुळे राज्यापालांकडून तातडीने ३० जूनलाच सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात आले आहे. यातून महाराष्ट्राचे राज्यपाल या कारस्थानात सहभागी झाल्याचेही दिसून येते. विधान परिषदेच्या १२ आमदारांची आणि नियमित सभापतींची नियुक्ती करण्यात दीर्घकाळ आडवे येणाऱ्या राज्यपालांचा हा आदेश संविधानाची हत्या करणारा आहे.”
“संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी केंद्रातील भाजपच्या फॅसिस्ट व धर्मांध एकाधिकारशाहीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच कसून विरोध करत आला आहे आणि यापुढेही करत राहील. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेला सामोरे जाईल तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले वरील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहून तिच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतील,” असेही नारकर म्हणाले.