
उरणच्या पाणथळ प्रदेशात अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा वावर असतो; मात्र अलीकडेच नवी मुंबईतील बेलापूर-खारघर पट्ट्यात तसेच उरणच्या पाणथळ परिसरात चार ते पाच ग्रे फ्रँकोलिन पक्षी आढळून आले आहेत. तितर कुटुंबातील असणारी ही प्रजाती शहरी भागात प्रथमच आढळून आली आहे.
हवामानातील बदलामुळे स्थानिक अधिवास असणाऱ्या ठिकाणी पक्ष्यांना खाद्याची कमतरता भासू लागते. उपासमारीमुळे त्यांचे अस्तित्वही धोक्यात येते. याची पूर्वकल्पना असल्याने अनेक पक्षी स्थलांतराचा मार्ग शोधू लागतात. उरण परिसरातील विस्तीर्ण जलाशय, पाणथळ क्षेत्र, खाडीकिनाऱ्यावरही विविध स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. या आकर्षक पक्ष्यांमध्ये विशेष चर्चेत आला आहे तो ग्रे फ्रँकोलिन.
सह्याद्रीच्या डोंगराच्या वरच्या पठारावर, माळशेज घाट आणि लोणावळा-खंडाळ्याच्या पूर्वेला असलेल्या मोकळ्या भूभागात हे पक्षी आढळून येतात. या पक्ष्याचा घरटे करण्याचा काळ निश्चित नसतो. स्थानिक परिस्थितीप्रमाणे, म्हणजे पावसाचं प्रमाण, पिके घेण्याच्या पद्धती आणि खाद्याच्या उपलब्धतेप्रमाणे त्यांची वीण होते; मात्र पहिल्यांदाच उरण येथील पाणथळ जागेत मुंबईच्या इतके जवळ या पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळत आहेत. दरम्यान, उरणच्या पाणथळ जागेत इतर प्रजाती देखील दिसून येत आहेत. ज्यामध्ये लाल-वाटलड लॅपविंग्स, लहान कान असलेले घुबड, मुनिया, श्राइक्स आणि राप्टर्सच्या अनेक पक्षी प्रजातींचा समावेश आहे.