विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज महासंग्राम,मते फुटू नये यासाठी चोख खबरदारी

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज महासंग्राम,मते फुटू नये यासाठी चोख खबरदारी

फोडाफोडी होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात ठेवले आहे. त्याचवेळी गुप्त मतदानामुळे मतं फुटू शकतात, हे लक्षात घेऊन सर्वच उमेदवारांकडून कोट्यापेक्षा किमान तीन-चार अधिक मतांची तजवीज करण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय महत्‍वाची आहे. कारण राज्‍यसभेचीच पुनरावृत्‍ती झाल्‍यास भाजपचे पारडे जड ठरणार असून आघाडीसाठी हा पराभव राजकीयदृष्‍टया अतिशय दूरगामी परिणाम घडविणारा ठरणार आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीत कागदावर भक्कम संख्याबळ असलेल्या महाविकास आघाडीवर मात करत भाजपने सहावी जागा जिंकली होती. अपक्ष व छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवण्यात भाजपाला यश आले होते. राज्यसभेला सहाव्या जागेसाठी जशी चुरस झाली तशीच, किंवा त्यापेक्षा अधिक चुरस यावेळी दहाव्या जागेसाठी आहे. गुप्त मतदान असल्याने ११ व्या जागेसाठीची अनिश्चितता अधिकच वाढली आहे.

विजयासाठी मतांचा कोटा २६.२० आहे. म्हणजेच पहिल्या फेरीत विजयी होण्यासाठी २७ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. विधानसभेत शिवसेनेचे ५५ आमदार असून सचिन अहिर व अमश्या पडवी या दोन उमेदवारांच्या विजयासाठी ५४ मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक व अनिल देशमुख यांनी मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकारल्याने राष्ट्रवादीची दोन मतं मतदानाआधीच बाद झाली आहेत. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे या दोन उमेदवारांच्या विजयासाठी त्यांना आता बाहेरची तीन मतं मिळवावी लागणार आहेत. काँग्रेसचे ४४ आमदार असून त्यांचेही दोन उमेदवार रिंगणात आहेत. चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी तब्बल दहा मतं बाहेरून मिळवावी लागणार आहेत. आघाडीतील तीन पक्ष या निवडणुकीत एकमेकांना मतं देऊ शकणार नाहीत.

दुसरीकडे भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे १०६ आमदार आहेत व पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १३५ मतांची गरज लागणार आहे. म्हणजेच पाचव्या उमेदवारासाठी सगळी मतं बाहेरून मिळवावी लागणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील मिळालेली १२३ मतं यावेळीही कायम राहिली तरी आणखी १२ मतांची गरज लागणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यासाठी पुन्हा एकदा फिल्‍डिंग लावली असून निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्‍या हाती घेतली आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in