‘ग्रीनिंग मुंबई’ उपयुक्त! ‘ग्रीनिंग मुंबई’ पुस्तिकेचे आश्विनी भिडे यांच्या हस्ते प्रकाशन

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. हिरव्या मुंबईसाठी पालिकेच्या उद्यान विभागामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जात असतात.
‘ग्रीनिंग मुंबई’ उपयुक्त! ‘ग्रीनिंग मुंबई’ पुस्तिकेचे आश्विनी भिडे यांच्या हस्ते प्रकाशन
PM

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. हिरव्या मुंबईसाठी पालिकेच्या उद्यान विभागामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जात असतात. विविध संस्था, सामाजिक संघटना यासाठी राबत असतात. मात्र हे प्रयत्न एकतर्फी राहायला नको, म्हणून ‘ग्रीनिंग मुंबई’ या माहिती पुस्तिकेद्वारे सर्वसामान्य मुंबईकर यात खारीचा वाटा उचलू शकतात. आपली मुंबई अधिकाधिक हिरवी राहावी, यासाठी मुंबईकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी केले. दरम्यान, हिरव्या मुंबईसाठी मुंबईकरांनी १० फेब्रुवारीपर्यंत सूचनांची नोंद करावी, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.

मुंबईतील घरांची बाल्कनी, इमारतींचे छत, गृहनिर्माण संस्थांचे आवार, लहान लहान बगीचे आदी ठिकाणी कमीत कमी जागेत विविध प्रकारची रोपटी, झाडे, फुले-फळझाडे कशी लावावीत, यासाठी पालिकेने ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘ग्रीनिंग मुंबई’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी प्रकाशन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उपअधीक्षक (वृक्ष प्राधिकरण) ज्ञानदेव मुंडे, ‘डब्ल्यूआरआय इंडिया’च्या कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला, ‘ओइकोस फॉर इकोलॉजिकल सर्व्हिसेस आणि ट्रान्सफॉर्मिंग’च्या कीर्ति वाणी, टाटा समाज विज्ञान संस्था अर्थात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या अविनाश कौर आदी मान्यवरांसह पर्यावरणविषयक अभ्यासक उपस्थित होते.       

मुंबईत वृक्षवल्ली अधिकाधिक बहरावी आणि त्या निमित्ताने पर्यावरण संतुलन टिकून राहावे, यासाठी महानगरपालिका अनेक उपक्रम हाती घेत असते. मुंबईत मुळातच जागेची कमतरता असल्याने येथे उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नातून महानगरपालिकेने ‘ग्रीनिंग मुंबई’ ही माहिती पुस्तिका तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेत पर्यावरणविषयक शास्त्रीय माहिती आहे. तिचा मुंबईकरांना वृक्षारोपण करताना नक्कीच फायदा होईल. ही माहिती पुस्तिका नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशन करण्यात आले आहे. त्यातील माहिती वाचून व अभ्यासून पर्यावरणविषयक जागरूक असलेल्या मुंबईकरांनादेखील यात आपली मते नोंदविता येणार आहेत. नागरिकांची मते प्राप्त झाल्यानंतर, योग्य आणि प्रत्यक्षात अंमलात आणता येतील, अशा सूचनांचा किंवा पर्यायांचादेखील पुस्तिकेत समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईकरांनी १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत आपले मत नोंदवावे, असे आवाहनही भिडे यांनी या निमित्ताने केले.

वृक्षारोपणाबाबत सचित्र, शास्त्रीय माहिती

उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी प्रास्ताविकातून उद्यान विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच ‘ग्रीनिंग मुंबई’ ही पुस्तिका तयार करण्यामागची पालिकेची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यास कशाप्रकारे वृक्षारोपण करता येणार, याबाबत पुस्तिकेत सचित्र आणि शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. मुंबईचे पर्यावरण संतुलन टिकून राहावे म्हणून आपण मुंबईकर काय-काय करू शकतो, याबाबतही पुरेशा माहितीचा समावेश या पुस्तिकेत करण्यात आला आहे, असे परदेशी यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in