मुंबई : किंग्ज सर्कल येथील जीएसबी गणेशोत्सव मंडळाने पाच दिवसीय गणेशोत्सवासाठी ४७४.४६ कोटी रुपयांचे विमा कवच घेतले आहे. सर्वात श्रीमंत गणेश मंडळ असल्याचा दावा करणारे ‘जीएसबी सेवा मंडळा’चे यंदा ७१ वे वर्ष आहे.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू होत असून जीएसबी गणेशोत्सव मंडळाचा गणपती पाच दिवसांसाठी असेल. जीएसबी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी सांगितले की, गणेशमूर्तीला ६९ किलोहून अधिक सोन्याचे दागिने, ३३६ किलोहून अधिक चांदी तसेच भक्तांनी दिलेल्या इतर मौल्यवान वस्तूंचा अलंकार केला जातो.
गणेशोत्सवाच्या विम्यामध्ये फर्निचर, सजावटीच्या वस्तू, डिजिटल साधने आणि स्थळावरील अन्य सामग्रीसाठी ‘फायर व स्पेशल पेरिल कव्हर’चाही समावेश आहे.
जीएसबी गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत त्यांना शिक्षणासाठी मदत करते. त्यामुळे वैयक्तिक प्रगतीबरोबरच सामाजिक प्रगतीलाही चालना मिळते, असे अध्यक्ष पै यांनी सांगितले.
असे असेल विमाकवच
६७.०३ कोटी रुपये : सोने, चांदी व इतर अलंकारांसाठी विमा.
३७५ कोटी रुपये : स्वयंसेवक, स्वयंपाकी, पुजारी, पादत्राणे स्टॉलवरील कामगार, व्हॅलेट आणि सुरक्षा रक्षकांच्या वैयक्तिक अपघात विम्यासाठी राखीव.
३० कोटी रुपये : सार्वजनिक दायित्व विम्यासाठी असून यात मंडप, स्टेडियम आणि भाविकांचा समावेश.