
मुंबई : प्रोडेक्शन हाऊसच्या सुमारे २२ लाखांच्या जीएसटी रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी नितीन कृष्णा भुवड या कर्मचाऱ्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मालाडच्या मालवणी परिसरात राहणारे मोहम्मद सलीम शेख यांची एक प्रोडेक्शन हाऊस कंपनी आहे. याच कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून कृष्णा हा अकाऊंटसह टॅक्ससंबंधित काम पाहत होता. मार्च २०२१ रोजी त्याने जीएसटीची रक्कम त्यांच्या खात्यातून ट्रान्स्फर होत नसल्याची बतावणी करून त्यांच्याकडून त्याच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर करण्याची विनंती केली हाती. त्यामुळे त्यांनी त्याला मे-जुलै २०२१ या कालावधीत सुमारे ४० लाख रुपये पाठविले होते. सप्टेंबर महिन्यांत त्यांना जीएसटीची रक्कम भरली नसल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी कृष्णाकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने जीएसटीची रक्कम न भरता त्यांनी दिलेल्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याची कबुली दिली. ही रक्कम सहा महिन्यांत परत करतो असे सांगून त्याने त्यांना १८ लाख रुपये परत केले; मात्र उर्वरित २२ लाख परत न करता या पैशांचा परस्पर अपहार करून त्यांची फसवणूक केली होती.