

मुंबई : गुरु तेगबहादूर (जीटीबी) नगर पुनर्विकास प्रकल्प परिसरातील दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांना स्वेच्छेने जागा रिकामी करून प्रकल्प उभारणीच्या कामासाठी सहकार्य मिळावे, यासाठी म्हाडातर्फे २० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदत कालावधीत सहकार्य न करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर २० ऑक्टोबरनंतर नियमानुसार निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.
जीटीबी नगर पुनर्विकास प्रकल्प परिसरातील दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांना म्हाडातर्फे ८ ऑक्टोबरला अनधिकृत गाळे निष्कासित करण्याच्या सूचना बजावण्यात आल्या होत्या. मात्र जीटीबी नगर प्रकल्प परिसरातील व्यावसायिक दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांनी आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. त्यांनी स्वतःहून जागा खाली करण्यासाठी मुदत देण्यात यावी, अशी विनंती केली. सद्यस्थितीत नवरात्रोत्सव व दसरा सणाचा कालावधी असल्याने संबंधितांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जयस्वाल यांनी यांनी मुदत दिली.