
मुंबई : मुंबईसह राज्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पारंपरिक वेशातील स्त्री-पुरुषांची मांदियाळी...डोक्यावरील भगवे फेटे...महिला व पुरुषांची दुचाकीवरील रॅली, लेझीम पथक, पालखी... कोळी नृत्य... आदिवासींचे तारपा नृत्य... अशा थाटामाटात गुढीपाडवा या हिंदू नववर्षारंभानिमित्त रविवारी गिरगाव, लालबाग, चिंचपोकळी, करी रोड, वरळी, दादर, परळ, विलेपार्ले, कुर्ला, बोरिवली, दहिसर, डोंबिवली, कल्याणसह राज्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आल्या.
वरळीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांसह बिग बॉस विजेता सूरज चव्हाण तसेच मराठी अभिनेत्री सहभागी झाले होते.
गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत पारंपरिक सणाचे दर्शन घडले. गिरगाव आणि ठिकठिकाणी या शोभायात्रा पारंपरिक पद्धतीने जल्लोषात निघाल्या. यात तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिला, तरुणाईने पारंपरिक वेषभूषेत बुलेट रॅली काढली. लालबाग-परळमध्ये दांडपट्टा, पारंपरिक खेळ खेळण्यात आले. सकाळपासूनच ढोलताशांच्या गजरात अनेक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या. यावेळी थोरा-मोठ्यांसह तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
ढोलताशा पथकाचे जोरदार सादरीकरण, पारंपरिक वेशातील महिलांचा सहभाग, तसेच काही ठिकाणी शोभायात्रेत चित्ररथ सहभागी झाले होते. वाटेत जागोजागी मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या नागरिकांसाठी बक्षिसे ठेवली होती. उत्कृष्ट वेशभूषेसाठी आकर्षक भेटवस्तूही दिल्या गेल्या. या पारंपरिक सणाच्या जल्लोषामुळे मुंबईतील वातावरण भारून गेले होते.
शोभायात्रेत मराठी भाषेचा जागर
लालबाग, परळ आणि काळाचौकी या गिरणगाव विभागातील ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्यावतीने हिंदू नववर्ष शोभायात्रेत यंदा मराठी भाषा 'स्व'त्वाच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त पार पडलेल्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभाग होता. परळ येथील श्री स्वामी समर्थ मठातून या नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेची सुरुवात सकाळी ८ वाजता करण्यात आली. 'गिरणगावचा राजा' चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुक्ता जयहिंद सिनेमागृह येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत शिवकालीन देखावा (गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान, लालबाग-परळ), अभिजात मराठी (स्वयंसिद्धा महिला मंडळ, परळ), हिंदुपदपादशाही (आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ), अमृत गोडी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ('आपली सोशल वाहिनी' अर्थात आसोवा - मराठी यूट्यूब चॅनेल), एकमेकां सहाय्य करू। अवघे होऊ श्रीमंत।। (मराठी उद्योजक - सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट) असे चित्ररथ होते. तसेच 'भारतमाता पालखी', पथनाट्य (आसोवा-मराठी यूट्यूब चॅनेल) महाराष्ट्रातील दांडपट्टा, लाठीकाठी अशा पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके, मल्लखांब, ढोलताशा हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. या शोभायात्रेत ‘दगडी चाळ’- १-२ , ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, ‘दुनियादारी’, ‘फक्त लढ म्हणा’ असे सिनेमे व ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘आभास हा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आदी मालिकेतील अभिनेते चंद्रकांत ऊर्फ बंटी विष्णू कणसे यांना ‘गिरणगाव भूषण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खरेदीसाठी बाजार फुलले!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, वास्तू प्रवेश करण्याची परंपरा असल्याने मुंबईतील बाजारांत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सराफा बाजारात अनेकांनी दागिने खरेदी केले. जुने दागिने मोडून नवीन दागिनेही केले. यात नेकलेस, गंठण, पाटल्या, ब्रेसलेट, अंगठी, कर्णफुले यासह कलाकुसरीच्या दागिन्यांचा समावेश आहे. बाजारात गर्दी होत असल्याने व्यापाऱ्यांनी ग्राहकांसाठी योग्य नियोजन केले होते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्यांना नीट खरेदी करता आली. काही जणांनी चांदीचे दागिने तयार करण्यासाठी ऑर्डर दिल्या. या सणानिमित्त बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.