
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात सिंह, कोल्हा, अस्वल या पाहुण्यांचे आगमन पावसाळ्यात होणार आहे. गुजरात व इंदूर प्राणीसंग्रहालयातातून प्रत्येकी एक जोडी राणीबागेत येणार आहे. परंतु त्याआधी इस्त्रायल देशांतून झेब्राची एक जोडी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून एजन्सीच्या माध्यमातून प्राण्यांची अदलाबदल होणार आहे. झेब्राच्या जोडीसाठी मुंबई महापालिका एजन्सीला ८४ लाख ६५ हजार रुपये मोजणार आहे. दरम्यान, सर्व परवानग्या मिळाल्यानंतर राणी बागेत नवीन पाहुणे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे लवकरच पर्यटकांच्या कानी सिंहाची डरकाळी पडणार आहे.
देश-विदेशातील पर्यटकांचे राणीबाग आकर्षण ठरत आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटकांसाठी विविध देशी व विदेशी प्राणी राणीबागेत आणण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. साकरबाग प्राणी संग्रहालय जुनागड, गुजरातहून एक आणि कमला नेहरू प्राणी संग्रहालय, इंदूर या दोन्ही ठिकाणाहून प्रत्येकी एक जोडी सिंह आणले जाणार होते. या बदल्यात राणीबागेकडून साकरबाग गुजरात प्राणी संग्रहालयाला झेब्राची जोडी द्यावी लागणार आहे. तर कमला नेहरू प्राणी संग्रहालयाकडून एक जोडी झेब्राच्या बदल्यात सिंहाच्या जोडीसह देशी अस्वल आणि लांडग्याची जोडी राणी बागेत येईल. सर्व प्राण्यांचे आगमन पावसाळ्यात होईल, असे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
प्राण्यांसाठी आवासस्थाने बांधण्याचे काम प्रगतीपथावर!
राणीबागेच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून आधुनिकीकरणाच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्राण्यांकरिता आवासस्थाने बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामांपैकी वाघ, बिबट्या, तरस, देशी अस्वल, पक्षी पिंजरा-१, कोल्हा, बाराशिंगा, चितळ, सांबर, आशियायी सिंह आदी प्राण्यांकरिता पिंजरे बांधून पूर्ण झाले असून काही प्राणी प्रदर्शित करण्यात आले आहेत. या उपक्रमात आता सिंहांच्या जोड्याही लवकरच येणार आहेत. सेंट्रल झू अॅथोरिटिनेही परवानगी दिल्याचे ते म्हणाले.