संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ उपक्रमात विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन ;पालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभागाचा उपक्रम

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ उपक्रमात विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन ;पालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभागाचा उपक्रम

मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह विद्यार्थ्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. पालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण व इंडियन पेडट्रिशिअन असोसिएशन यांच्या सहकार्यातून ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या कार्यक्रमाअंतर्गत ८ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांना आहार तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात हे शिबिर होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, सहआयुक्त (शिक्षण) गंगाधरन डी. यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्यही सुदृढ राहावे, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या शिबिराच्या उद्घाटनाला उपआयुक्त (परिमंडळ २ तथा शिक्षण) रमाकांत बिरादार उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन झाल्यानंतर आहारतज्ज्ञ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच आहाराबाबत प्रश्नमंजुषादेखील होणार आहे.

६०० विद्यार्थी ५० शिक्षकांना लाभ

पालिकेतील सुमारे ६०० विद्यार्थी व ५० शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच पालिका क्षेत्रातील इतर सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना या कार्यक्रमाचा यूट्यूब लिंकद्वारे ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. पालिकेच्या ४५० शालेय इमारतींमधील ११५० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तसेच डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ विद्यार्थी व शिक्षकांना होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in