मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे ५ हजार १०० पोस्टकार्ड सजवून तयार केलेल्या विश्वातील सर्वात मोठ्या वाक्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला आहे. या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुळे मागील रेकॉर्डधारक चीनला भारताने मागे टाकले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जागतिक वारसा स्थळ आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. भारतातील सर्वाधिक छायाचित्र इथे काढण्यात येतात. तसेच ऐतिहासिक वर्किंग हेरिटेज संरचना आहे. आता पोस्टकार्डसह तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या वाक्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुळे हे चर्चेचे ठिकाण बनले आहे.
हे वाक्य तयार करण्यासाठी ५ हजार १०० पोस्टकार्ड वापरून नवीन रेकॉर्ड स्थापित करण्यात आला. “सबमें राम...शाश्वत श्री राम” हे वाक्य तयार करण्यासाठी ५२ समर्पित स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. हे वाक्य तयार करण्यासाठी त्यांना ९ तास ३० मिनिटे लागली.
मागील विक्रम शांघायमधील फ्रिसलँड कॅम्पिनाकडे (चीन) होता. त्यांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी १ हजार ३५२ पोस्टकार्ड वापरून एक वाक्य तयार केले होते. त्यासाठी २० लोकांनी सहभाग घेतला होता. ते वाक्य पूर्ण करण्यासाठी १६ तास लागले होते.
भारतीय रेल्वे आणि इतर संस्थांद्वारे आयोजित तीनदिवसीय महोत्सवात भारत आणि विदेशातील नामवंत साहित्यिक व्यक्ती, कलाकार आणि मान्यवरांच्या सहभागासह साहित्यिक परिसंवाद, दृश्य कला आणि परफॉर्मिंग आर्ट्स सादर होतील. हे पर्व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा आणि समकालीन संदर्भात भावी पिढ्यांसमोर सादर करण्याचा अनोखा प्रयत्न आहे.