घड्याळ्याच्या वादातून जिम ट्रेनरवर हल्ला

काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या घड्याळ्याची अदलाबदल केली होती; मात्र मेहबूबला ते घड्याळ आवडले नाही
घड्याळ्याच्या वादातून जिम ट्रेनरवर हल्ला

मुंबई : घड्याळयाच्या वादातून मोहम्मद नायाफ इम्तियाज बलोच या २६ वर्षांच्या जिम ट्रेनरवर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. मेहबूब मुक्तार अहमद असे (२४) असे या मारेकऱ्याचे नाव असून, हल्ल्यानंतर तो उत्तरप्रदेशात पळून गेला होता. त्याला उत्तरप्रदेशातील त्याच्या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात असल्याचे पोलिसांनी सागितले. मोहम्मद नायाफ हा गोरेगाव येथे राहत असून, एका जिमध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. याच जिममध्ये मेहबूब हा नियमित येत होता. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती.

काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या घड्याळ्याची अदलाबदल केली होती; मात्र मेहबूबला ते घड्याळ आवडले नाही. त्यामुळे त्याने मोहम्मद नायाफकडे त्याच्या घड्याळाची मागणी केली होती. त्याने ते घड्याळ परत केले नाही म्हणून त्याने त्याच्याकडे घड्याळाच्या पैशांची मागणी केली; मात्र त्याने पैसे देण्यासही नकार दिला. त्यामुळे ६ डिसेंबरला तो जिममध्ये गेला आणि त्याने मोहम्मद नायाफवर चाकूने वार केले होते. त्यात त्याच्या गालावर व छातीवर गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर मेहबूब तेथून पळून गेला होता.

logo
marathi.freepressjournal.in