
मुंबई : सणासुदीच्या काळात दादर पश्चिम हे खरेदीसाठी मुख्य ठिकाण असते. दिवाळीत तोरणं, रांगोळ्या, फुलं, आकर्षक देखावे, लाईटिंग अशाप्रकारची दुकाने रस्त्यावर थाटली जातात. शनिवारपासून दिवाळीला सुरुवात होत असून पाडव्यापर्यत रस्त्यावर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, अशी सूचना मुंबई महापालिकेला केल्याचे शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. केसरकर यांच्या सूचनेनंतर दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईला स्थगिती देण्यात आल्याने फेरीवाल्यांना राजकीय अभयच मिळाल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे.
दादरमध्ये कोणत्याही सणासुदीच्या आधी आणि नंतर मुंगीला पाय ठेवायलाही जागा नसते. त्यात दादर पश्चिम हे सणासुदीच्या काळात खरेदीचे मुख्य ठिकाण. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी होते. त्यात दादर, माहिम येथे फेरीवाले बस्तान मांडतात. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. ग्राहकांची एवढी गर्दी असते की, अनेकदा चेंगराचेंगरी होऊन, काही ग्राहकांचा श्वासही गुदमरतो.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दादरमध्ये दिवाळी सणानिमित्त पुन्हा ग्राहक व फेरीवाल्यांची गर्दी वाढली आहे. ही गर्दी इतकी प्रचंड आहे की, स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर कबूतरखाना गाठण्यासाठी किमान अर्धा तास लागतो. याबाबत दादरकरांनी मुंबई महापालिकेच्या जी. उत्तर विभागात तक्रार केल्यानंतर पालिकेने मंगळवारी पोलिसांच्या बंदोबस्तात फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली. ऐन दिवाळीत ही कारवाई करण्यात आल्यामुळे फेरीवाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, दादर स्टेशनबाहेर आंदोलन केले होते. या आंदोलनात दिवाळी सणानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात आकाश कंदीलसह अन्य साहित्य विकणाऱ्या फेरीवाल्यांची सर्वाधिक संख्या होती.
दरम्यान, या आंदोलनाची दखल खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली. दिवाळी सणानिमित्त आकाश कंदील व अन्य साहित्य विकण्यासाठी अनेक बेरोजगार युवक व महिला आपला व्यवसाय करतात. दिवाळी संपल्यानंतर नियमित व्यवसाय करणारे वगळता, अन्य फेरीवाले पदपथ व रस्त्यावर दिसत नाही. सणानिमित्त बेरोजगारांना रोजगार मिळत असल्यामुळे अशावेळी पालिकेने कारवाई स्थगित ठेवावी, असे निर्देश केसरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने किमान भाऊबीजेपर्यंत दादर येथील फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.