
मुंबई : हाजी अलीवरून दादरला किंवा माटुंगा-माहीमला पोहोचण्यासाठी प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी आता राज्य सरकारने हाजी अली ते परळ दरम्यान १.५ किमी लांबीचा उन्नत रस्ता प्रस्तावित केला आहे. त्यामुळे हाजी अली-परळ हे १.५ किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच मिनिटांत पार करता येणार आहे.
फिनिक्स मिल्स आणि कमला मिल्सकडे जाणाऱ्या सेनापती बापट मार्गाला लाला लजपतराय रोडच्या हाजी अली टोकाशी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी एक नवीन उन्नत रस्ता प्रस्तावित असून तो कोस्टल रोडला जोडणार आहे. विशेष म्हणजे या नव्या मार्गामुळे परळ, दादर, माटुंगा आणि माहीम या गर्दीच्या भागातून प्रवास करणारे लोक काही मिनिटांतच हाजी अली जंक्शनजवळील कोस्टल रोडवर पोहोचू शकतील.
मुंबई शहराच्या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा प्रस्तावित सहा-लेनचा उन्नत कॉरिडॉर महालक्ष्मी रेसकोर्सच्या काठावरून आणि एनएससीआय डोमजवळून जाईल. या प्रकल्पासाठी कोणत्याही भूसंपादनाची आवश्यकता नाही आणि बांधकामादरम्यान वाहतुकीचा प्रवाहही विस्कळीत होणार नाही, अशी माहिती शहरी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासंबंधीचा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या प्रस्तावित उन्नत मार्गासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला असला तरी या प्रकल्पाची अंमलबजावणी नक्की कोण करणार, हे अद्याप स्पष्ट नाही. नवीन मार्ग लाला लजपतराय रोडवरील कोस्टल रोडच्या प्रवेशद्वाराजवळून सुरू होईल आणि रेसकोर्स ट्रॅक आणि एनएससीआय स्टेडियमच्या बाजूने मोकळ्या जागेतून जाईल. पुढे सेनापती बापट मार्गाच्या ई. मोझेस रोडच्या टोकाजवळ येईल. तेथून वाहनचालकांना गोखले रोड, भवानी शंकर रोड, एनएम जोशी मार्ग आणि पुढे सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, लोअर परळ आणि माहीमसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सहज प्रवेश मिळेल.