मालाड येथील बेकायदा बांधकामांवर हातोडा

जिल्हाधिकारी व पालिकेची एमआरपीटी अंतर्गत कारवाई
मालाड येथील बेकायदा बांधकामांवर हातोडा
@ANI

मुंबई : मालाड पश्चिम येथील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेच्या पी उत्तर विभागाने घेतला आहे. मालाड मार्वे चारकोप कब्रिस्तानच्या समोर असलेली ७५ बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. जिल्हाधिकारी व पालिकेची ही संयुक्त कारवाई असल्याचे पी उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता राजन प्रभू यांनी सांगितले.

या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून, वाहतूककोंडी फुटणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या ठिकाणी पुन्हा बेकायदा बांधकामे झाल्याचे निदर्शनास आल्यास एमआरपीटी अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्याचे पी उत्तर विभागाचे असिस्टंट इंजिनिअर प्रवीण मुळीक यांनी सांगितले.

मालाड पश्चिम चारकोप येथील कब्रिस्तानच्या समोर बेकायदा बांधकामे झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटीसीकडे दुर्लक्ष करत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर बेकायदा बांधकामे करत जागेवर कब्जा केला होता. अखेर बुधवारी पी उत्तर विभागाचे असिस्टंट इंजिनिअर प्रवीण मुळीक व सब इंजिनिअर विकास क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली फर्नीचरच्या दुकानासह बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईसाठी ६ बुलडोझर, ४ डंपर व ४० कर्मचारी व स्थानिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in