Mumbai : हँकॉक पुलाची कामे अंतिम टप्प्यात; उर्वरित कामांसाठी BMC निविदा काढणार

मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची पुनर्बांधणी पूर्ण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्‍त्‍यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
हँकॉक पुलाची कामे अंतिम टप्प्यात
हँकॉक पुलाची कामे अंतिम टप्प्यात
Published on

मुंबई : मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची पुनर्बांधणी पूर्ण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्‍त्‍यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूस नवीन रस्तारेषेनुसार काही व्यावसायिक आस्थापना बाधित होत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाने तातडीने पूर्ण करावी. उर्वरित कामांसाठी निविदा काढावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

माझगाव आणि डोंगरी यांना जोडणारा हँकॉक उड्डाणपूल जीर्ण झाल्याने मध्य रेल्वेने जानेवारी २०१६ मध्ये त्याचे पाडकाम केले. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महापालिकेच्यावतीने फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण करण्यात आले तर ऑगस्ट २०२२ मध्ये या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, काही तांत्रिक व न्‍यायप्रविष्‍ट बाबींमुळे पुलाची उर्वरित कामे खोळंबली आहेत. या पार्श्वूभूमीवर, उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी पुढील आढावा अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी घेतला. यावेळी पालिकेचे उपायुक्त गिरीश निकम, ई विभागाचे सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळ्ये यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबतचे नियोजन, म्हाडा उपकर इमारतींमधील रहिवासी, गाळेधारकांचे पुनर्वसन या विषयांवर सविस्‍तर चर्चा करण्यात आली.

पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा काढणार

रेल्वे हद्दीत पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्‍त्‍यांची कामे अंशत: पूर्ण झाली आहेत. पुलाच्या पश्चिम बाजूला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपकर इमारती आहेत. त्या ठिकाणी काही वाणिज्यिक आस्थापना, भाडेकरू आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि म्हाडा प्रशासन यांनी आपापल्या धोरणानुसार त्यावर तोडगा काढावा. काही भाडेकरूंनी माननीय उच्च न्यायालयात प्रकरण नेले. त्‍यावर माननीय न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत. हे स्थगिती आदेश उठविण्यासाठी महानगरपालिकेने वरिष्ठ विधिज्ज्ञांची मदत घ्यावी. न्यायालयीन प्रकरणात योग्य पाठपुरावा करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in