प्रतिनिधी/मुंबई
शिवसेनेचे (ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीला पोलिसांकडून योग्य तो न्याय मिळणार नाही. हत्येशी संबंधित काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही त्याचा योग्य तो तपास होत नाही. त्यामुळे आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही. या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत, अभिषेक हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि अभिषेकचे वडील विनोद घोसाळकर, अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर आणि कुटुंबीयांनी केली आहे. मॉरिसकडून मलाही मारण्याचा कट होता, अशी शंकाही तेजस्विनी घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या प्रकरणाशी संबंधित माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर, अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी सीबीआयकडून तपास करण्याची मागणी केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही आहे. या तपासाबाबत आम्ही जमा केलेली माहिती तपास यंत्रणेला आणि पोलीस आयुक्तांना सीसीटीव्ही फुटेजसह सादर केली. हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर, याबाबत सखोल तपास करावा, अशी मागणी केली होती. परंतु याबाबत पोलिसांनी आजवर सखोल तपास केलेला नाही. १२०-ब कलम लावण्याची आमची मागणीही मान्य करण्यात आलेली नाही, असे तेजस्विनी घोसाळकर यांनी सांगितले.
अभिषेकच्या हत्येदरम्यान घटनास्थळी अभिषेक व मॉरिस नरोन्हा या दोघांना मारणारा तेथे तिसरा कोणी होता का? या दृष्टिकोनातूनही तपास करा, अशी आमची मागणी आहे. जर यात कोणी सहभागी असेल तर चौकशीतून स्पष्ट होईल, असे सांगतानाच यासंदर्भात आम्ही न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणार असल्याचे विनोद घोसाळकर यांनी सांगितले. हत्येप्रकरणी कुठल्याही राजकीय व्यक्तीचे नाव घेणार नाही, असे म्हणत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आमच्या नगरसेवकांवर दबाव टाकला जातोय. राजकारणी लोक निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांवर दबाव टाकत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मलाही मारण्याचा कट होता
मॉरिस नरोन्हा याने अभिषेकला ज्या कार्यक्रमाला बोलावले, त्या कार्यक्रमात मलाही घेऊन येण्यास सांगितले होते. तसे आपणास अभिषेकनेही सांगितले होते. परंतु, आपणास उशीर झाला म्हणून माझ्या पतीने मला फोन करून दुसऱ्या कार्यक्रमास जाण्यास सांगितले. याचा अर्थ अभिषेकची हत्या झाली तेव्हा मलाही मारण्याचा कट असावा, अशी शंका तेजस्विनी घोसाळकर यांनी व्यक्त केली. पण माझ्या मुलांच्या नशिबामुळे मी तेथे पोहोचले नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.